Saturday, February 05, 2011

Land prices near the Sea shore area increases

--- Sakal News ---

बड्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिकांची गुंतवणूक
दापोली : कोकणात जमिनींची खरेदी विक्री जोरात सुरू आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या जमिनींना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने समुद्रालगतच्या जमिनींचे दर गुंठ्याला 2 लाख ते 3 लाखापर्यंत पोहोचले आहेत.

गेल्या दहा वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय वाढू लागला आहे. राज्यभरातून पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. त्यातच सागरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. यामुळे भविष्यात कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याबरोबरच कोकणात आंबा, काजू, रबर व औषधी वनस्पती लागवडीला मोठी संधी आहे. हे राज्यभरातील गुंतवणुकदारांच्या लक्षात आले आहे आणि या संधीचा अचूक लाभ उठविण्यासाठी राज्यभरातील गुंतवणुकदारांनी, बांधकाम व्यावसायिकांनी कोकणात जमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. समुद्रालगतच्या जागांना पर्यटन व्यवसायासाठी मोठी मागणी असल्याने समुद्रालगतच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. दापोली व गुहागर तालुक्‍यांमध्ये समुद्रालगतच्या जमिनींचा गुंठ्याचा भाव सद्यस्थितीला 2 ते 3 लाखावर पोहचला आहे. रत्नागिरीतही समुद्रालगतच्या जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. रो हाउस, बंगलो स्कीम, सदनिका बांधण्यासाठी ही जागा खरेदी करण्यात आल्या आहेत. या बरोबरच आंबा, काजू, रबर व वऔषधी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी सुरू आहे.

ज्या तालुक्‍यांना समुद्रकिनारा लाभलेला नाही, त्या खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्‍वर आदी तालुक्‍यांमध्ये आंबा, काजू, रबर, वनौषधी, आवळा, बांबू लागवडीसाठी जागा खरेदी सुरू आहे.

मंडणगड, दापोलीत मोठी गुंतवणूक

दापोली तालुक्‍यात गेल्या पाच वर्षात 13880 जमिनींचे खरेदीखत झाले आहे. यातील फार कमी व्यवहार गुंठ्यातील जागांचे झाले असून एकरमधील जागांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. याबरोबर दापोली शहरात सद्यस्थितीत सदनिकांचे प्रती स्क्‍वेअर फूटचे दर 2500 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. यावरून जागांची खरेदी-विक्री किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, याची कल्पना येते.

No comments: